विवाहित_महिलेचे_परपुरुषांसोबत_मैत्रीपूर्ण_संबंध नवरोबांना खटकत असल्यास हा प्रश्न म्हणजे विवाहित महिलांवर खोटे आरोप करण्यासारखा ठरेल
एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या कि आपल्या देशात पुरुषांना जे अमर्याद स्वातंत्र्य उपलब्ध आहे त्याचा आपण किती साळसूदपणे वापर करतो हे ज्याचे त्याने तपासून पाहावे. महिला कमावती जरी असेल तरी आजही जवळपास ७०-८०% महिला स्वतःच काळजीपूर्वक लवकरात लवकर घरी पोहोचण्यास उत्सुक असतात. का? कारण रस्त्यावर फिरणारे सर्वच बापे लोक आपल्या इथे रक्षणकर्ते म्हणून वावरत नाहीत. उलट जास्त वेळ बाहेर राहिल्यास घरातूनच सासूबाईंच्या कानपिचक्या मिळतात हा भाग तर एक स्वतंत्र विषय आहे. म्हणजे कमावती असली तरी अडचण आणि नसली तरी अडचण आहे आपल्या समाजात.
बरं पुरुषांचे मैत्रीपूर्ण संबंध बायकोने भ्रमणध्वनी धुंडाळल्यावर किंवा फेसबुक वा तत्सम व्यासपीठावरील आपल्या कर्तृत्वाचा आढावा घेतल्यावर जर समोर येत असतील तर ही गुप्त मैत्री नसेल याचा काय भरवसा? तुम्ही पहिल्या दिवशी सांगितलं तर ती आकांडतांडव करेल. तुमच्या या मैत्रीपूर्ण मैत्रिणीला आपल्या बायकोची मैत्रिण बनवा कि पहिले. तुमच्या मैत्रिणीने तुमच्या बायकोचा विश्वास संपादन केल्यास तुम्ही तिघेही चांगले मित्र बनाल. जाणीवपूर्वक झाकून ठेवलेल्या गोष्टी अचानकपणे समोर आल्यास कोणत्याही वैवाहिक संबंधांमध्ये अडचण निर्माण करणारच. पहिलेच सांगा आणि मर्यादा पाळा.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मैत्रीण एकच असल्यास प्रकरण संशयास्पद वाटणारच. रोजच काय बोलणार तुम्ही एकाच मैत्रिणीसोबत? मैत्रीपूर्ण संबंध म्हणजे घरोबा असे तर नाही होत ना हे हि तपासून बघायला हवे. थोडक्यात बायको असताना तिच्या हक्काचा वेळ तुम्ही इतर कोणत्याही स्त्रीला दिल्यास कोणत्याही बायकोला हे कधीच पटणार नाही. आपल्या बायकोने परपुरुषासोबत रोज गप्पा मारणे किंवा रोज मित्राला भेटणे रुचत असेल तर ती देखील आपले मैत्रपूर्ण संबंध घेईल खपवून मग.
वैवाहिक आणि विवाहागोदरच्या जीवनात भयंकर फरक असतो. तसेच आपल्या जीवनसाथीसोबत आपले सबंध किती मोकळेपणाचेआहेत आणि दोघांनीही एकमेकांना दिलेली वागणूक सामान आहे कि नाही या गोष्टी पडताळून बघितल्यास अशा गोष्टींमुळे अडचण निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. जर मित्र किंवा मैत्रीण खूप जुनी असेल, किंवा घनिष्ट असेल तर आपल्या साथीदाराला आपण त्याची उघडपणे कल्पना द्यावी आणि आपल्या साथीदारालाही आपल्या मैत्रीमध्ये थोडी जागा दिल्यास संशयाला जागा उरणार नाही. याचा अर्थ पुन्हा गैरफायदा घेत कडेलोट होईपर्यंत मैत्रीच्या नावाखाली उपद्व्याप करणे नव्हे याचीही जाणीव असणे अत्यंत गरजेचे आहे