आपल्या वयाच्या दहा वर्ष मोठ्या माणसाच्या प्रेमात मी पडले कशी, याचं नवल मलाचं वाटतं..दिसायला एकदम दणकट, राकट म्हणजे कोणतीही मुलगी भावसुद्धा देणार नाही असा.
कॉलेजमध्ये येऊन टवाळक्या करायच्या. बसल्या जागची जमीन थुंकून लाल करायची. बुलेट काढून सगळ्या कॉलेजला कानठळ्या बसवायच्या, पण पोरींच्या बाबतीत फुल रिस्पेक्ट. टुकार पोरांचा कॉलेजमध्ये असताना त्रास व्हायचा. त्यांच्या प्रोपोज ला नकार दिला की गाडीची हवा सोड, सीट फाड असे भिकार चाळे चालायचे. याच्याशी ओळख झाल्यानंतर या सगळ्या लफड्यातून सुटका झाली…
त्याचा आधार वाटायचा. प्रेम वगैरे होतं हे फार नंतर कळालं. एखादा पुरुष आपल्यासाठी ढसाढसा रडतो हे पाहिल्यानंतर मनात कालवायचं. २१ वर्षाची होते मी. कोणताही निर्णय घेण्याची अक्कल नव्हतीच. घरच्यांना खोटं बोलून त्याच्यासोबत फिरायला जायचे. कित्येकदा असे प्रसंग आले, त्याच्या मनात आलं असतं तर तो वाट्टेल ते करू शकला असता. मीदेखील आडवलं नसतं. उलट मलाच कधी कधी इच्छा व्हायची. मिठी मारून पाठीवर हात फिरवायला पाहायचे पण तो तिथेच आडवायचा.तू लहान आहेस बेटा, हे सारं नको….
त्याचं लग्न झालं पण मला त्याची लागलेली सवय काही सुटत नव्हती. वाटायचं कशाला त्याच्या संसारात ढवळाढवळ करायची. कितीही प्रयत्न केला तरी राहावायचं नाही आणि मी फोन करायचे. उगाच रडायचे. तो समजावून सांगायचा. लग्न कर म्हणायचा, तुझं मन रमेल. मी तर त्याची रखेल म्हणून राहायलाही तयार होते…
त्याने जपलं मला. माझ्या मनाला सांभाळलं. तिशी पार केलेल्या पुरुषाला एक विशीतली तरणीताठी पोरगी सर्वस्व देत होती, पण त्याने मोह कधीच केला नाही. भेटायला यायचा. बायकोसोबतचे फोटो पाहिले की मी चिडायचे. तुला आता मिळाली, माझी कशाला काळजी वाटणार. त्याने तोल कधीच ढळू दिला नाही. माझ्या बालीशपणाला परिस्थितीचं भान आणून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला…
आज मला एक मुलगी आहे. नवरा चांगला कमवणारा, प्रेम करणारा, सगळं सुखात. कॉलेजचा विषय निघाला की आठवण येते त्याची. फेसबुकवरून कॉन्टँक्ट देखील केला मी. भेटायला येशील का विचारलं. सुरुवातीला तो नाही म्हणाला, मग मीच जास्त फोर्स केला. मॉल मध्ये भेटायचं ठरलं. आरशासमोर नटताना वेगळाचं उत्साह होता. लिपस्टिक नीट लागलीये का हे पुन्हा पुन्हा निरखून पाहिलं. दिवाळीत घेतलेली नवीन कोरी साडी नेसली. दर्ग्याशेजारून आणलेलं छान अत्तर लावलं, त्याला आवडणारं. ठरल्या वेळेला संध्याकाळी पोहचले…
तास दोन तास झाले, तो आलाच नाही. मी फोन लावला पण लागतचं नव्हता. वाट पाहायचं ठरवलं. आठ वाजून गेले तरी तो नव्हता आलेला. प्रचंड राग आला. ही कुठली वागण्याची पद्धत झाली. चिडचिड करत मी रिक्षा पकडली. त्याचा कॉल आला. हावरटासारखा मी लगेच उचलला…
“छान दिसत होतीस. सुंदर अगदी. बऱ्याच दिवसांनी पाहिलं तुला. तुझी मुलगी अगदी तुझ्यावर गेलीये. फेसबुकवर पाहिलं मी. काही आठवणी आठवणीच चांगल्या असतात बेटा. त्यांना फुलासारखं जपायचं. तुला आज पाहिल्यानंतर ते सगळे दिवस आठवले. किती बदल झालाय तुझ्यात. मला मोह नसता आवरला म्हणून समोर नाही आलो. स्वतःला असंच जप. काळजी घे, तुझी आणि घरच्यांचीसुद्धा…..”
फोन कट झाला. पुन्हा लागणार नाही याची खात्री होती. आजही तोच जिंकला. मी अजूनही लहानच आहे, बालिश,पोरकट. तो मैदानात उतरलाचं नाही. स्वतःची विकेट राखून ठेवली त्यानं…..माझा डाव सावरण्यासाठी.
– अभिनव ब. बसवर