crossorigin="anonymous"> लव्ह स्टोरी -6 | The Marathi

#MAanacheshlok

क्या करेगा काझी…

श्रद्धाचे पोलिसांना लिहीलेले पत्र मिडियाने प्रसिध्द केले तशी पोलिसांच्या दिशेने संशयाची सुई वळली. यांनी ही हत्या रोखण्यासाठी काहीच प्रयत्न कां केले नाहीत…असे सर्वांचे विचारणे आहे. काय आहे सत्य?

हिंसाचाराची तक्रार आली तर पोलीस अ दखलपात्र गुन्हा नोंदवून पुरुषाला कैद करू शकतात. पण त्यापूर्वी चौकशी करणे व त्या तक्रारीत तथ्य आहे याची खातरजमा करणे आवश्यक असते.

कायदा सांगतो,शक्य तितके ‘तुटणार नाही असे पहा’. मग पोलीसही “होता होईल तो जुळवून घ्या” म्हणतात. पुरुष माफी मागून,” इलू इलू” म्हणतो आणि बाईची तक्रार विरून जाते. हातात हात घालून दोघे घरी जातात,केस फाईलीत बंद होते,फाईल धूळ खात पडते.

नेहमी बाई येते ती रडत ,ओरडत. नुकतीच घटना घडलेली आहे,फार राग आलेला आहे आणि “तुला शिकवीन चांगला धडा” हा एवढाच उद्देश असतो. पोलीसही नव-याला जरा दम भरतात आणि सोडून देतात. नेहमी मीच मार खाते पण आज पोलीसांसमोर वाघाची शेळी झाली याचा आनंद पुरेसा असतो.मामला थंड होतो.

श्रध्दाची केस वेगळी होती. पोलीसांना चकवून गेली.श्रध्दा आली तीच मुळी भेदरलेल्या अवस्थेत. तिने स्पष्ट लिहीले होते की, “आजवर मी धीर गोळा करू शकले नाही म्हणून तक्रार दिली नाही.तो मला ब्लॅक मेल करतो. ” म्हणजे ती दहशती खाली होती. तिला संरक्षणाची गरज होती.

पुढे ती लिहिते, “ त्याने माझा गळा दाबून मला मारण्याचा प्रयत्न केला. तो मला ‘गळा दाबून मारीन व तुझे तुकडे करून विखरून टाकीन’ म्हणतो.” इथे त्याच्या मनात तिला मारायचे नक्की ठरले आहे व कसे मारायचे याचा प्लॅन सुध्दा तयार झाल्याचे स्पष्ट दिसत होते. त्या नंतर फक्त योग्य संधी मिळण्याची काय ती खोटी असते. श्रध्दाचा मृत्यू अटळ असल्याचे अगदी स्पष्ट दिसत होते. पोलिस चुकले ते इथेच. आपण शिकलेल्या ‘गुन्हेगाराचे मानशास्त्र’चा त्यांनी वापर केला नाही.  इतर केसेस सारखीच ही केसही किरकोळ समजून फारशी गांभीर्याने घेतली नाही.

खरं तर महिला दक्षता समितीने कुटूंबातील मारहाणी/हिंसेबाबतच्या अशा प्रत्येक केसची दखल घेतली पाहिजे व पाठपुरावा केला पाहिजे.  श्रध्दाची दर आठवड्याला कुणीतरी भेट घ्यायची व्यवस्था व्हायला हवी होती. महिन्यातून एकदा खुद्द इन्सपेक्टर ताईंनी गणवेषात महिला दक्षता समिती सदस्ये बरोबर जाऊन श्रध्दाच्या घरी तिची भेट घ्यायला हवी होती. म्हणजे मामला सर्वश्रुत झाला असता. सगळ्यांनी लक्ष ठेवले असते. अधून मधून तिला पोलीस स्टेशनला बोलावून घेत ख्याली खुशाली जाणून घ्यायचा शिरस्ता ठेवायला हवा होता. त्यातून आफताबला संदेश मिळालाअसता की, श्रध्दाला गायब करता येणार नाही. तेवढे तिचा जीव वाचवायला पुरेसे होते.

आता इथून पुढे तरी अशी काळजी घ्यावी. “जब जागो तभी सवेरा!”

आम्ही मुंबईत पळून येणा-या मुलींच्या सुरक्षेबद्दल शोध घेत होतो. तेव्हा लक्षात आले की अंडर वर्ल्ड ची एक तुकडी प्रत्येक शहरातल्या रेल्वे व बस स्थानकावर तैनात असते. अगदी शिस्तबध्द रीतीने काम चालते. एकदा आम्ही ही गेलो. दोन मुली ट्रेन मधून उतरल्या. आम्ही त्यांची विचारपूस केली. “ नापास झालो आहे. आई रागवेल म्हणून जीव द्यायला चाललो आहे.” त्यांचे उत्तर. “मुंबईच कां?” आम्ही विचारले. त्यावर त्यांचे निरागस उत्तर, “ विचार केला, मरायचेच आहे तर एकदा अमीर खानला भेटून घेऊ.” “तो कुठे भेटला असता?”  “ टॅक्सी वाल्याने नेले असते” …. कळले? मुली अशा गायब होतात.

आम्ही तो मुद्दा लावून धरला. आज प्रत्येक स्टेशन वर 24 तास महिला पोलीसांची गस्त असते. त्याचा उगम आम्ही केलेल्या त्या अभ्यासात आहे.महिलांसाठी कामकरणा-यांनी असे प्रो अ‍ॅक्टिव्ह असायला हवे. महिला दक्षता समितीने आपल्या पोलीस स्टेशन मधे दाखल झालेल्या तक्रारींची माहिती घेऊन काही योजना तयार करून आधार दिला पाहिजे.

श्रध्दाला काऊंसेलिंगची सुध्दा गरज होती. ब्लॅक मेल कसे होत होते.. याची पोलिसांनी माहिती घ्यायला हवी होती. धीर देऊन अ‍ॅबाहेर पडायला मदत करायला हवी होती. वाघाच्या जबड्यात सापडलेल्या कोकरागत ती हातपाय गाळून स्वस्थ बसली. म्हणून हकनाक बळी गेली.

श्रध्दाने पोलीस हेल्प लाईनचा वापर कां केला नाही याचीही माहिती समाजा पुढे आली पाहिजे.

आमच्या गावात एक आई-बापाविना पोरकी पोर लग्न होऊन आली. तिचा छळ होत होता हे सगळ्यांना माहित होते. पण कायद्याने सक्तीचे असूना सुध्दा महिला दक्षता समिती नव्हती. तिचा मृत्यू झाला तेव्हाच ‘महिला दक्षता समिती’स्थापन झाली. आपण फार आळशी आहोत. अपघात झाल्याशिवाय सिग्नलचे खांब बसत नाहीत. एखादा मेल्यावर मात्र रातोरात खांब बसतात. ही वृत्ती सोडून दिली पाहिजे.

धोक्याचा माग काढत राहिले पाहिजे. प्रत्येक जण दक्ष राहील तरच सगळ्या श्रध्दांना संरक्षण मिळेल.

अंगणात पाणी साचलेले दिसले तर तरूण मंडळांनी ते बुजवले पाहिजेत. म्हणजे लहानगी त्यात पडणार नाहीत. आपल्या देशात या बाबतीत एकात्मता आहे. कुणी कुणाच्या फंदात पडत नाहीत.

हा राष्ट्रीय एकात्मिका सप्ताह आहे.

चला तर शपथ घेऊ या की, “ सजग आणि सतर्क राहीन व एकही जीव बळी जाऊ नये या साठी कृतीशील राहीन.”