crossorigin="anonymous"> लव्ह स्टोरी -7

फटकन तिनं दार लोटून घेतलं. त्याचा आवाज जाणवण्याइतपत मोठा होता पण तिला पर्वा नव्हती,’सुटले काही तासांसाठी’ ह्या मनातल्या आनंदाचं खरंतर  ते प्रतिबिंब असावं!

तिनं आधी स्वयंपाक घरात जाऊन गॅस नीट बंद आहे ना ते पाहिलं. मग बेडरूम मध्ये गेली.तो चुडीदार बदलून छान सुटसुटीत ड्रेस घातला.लेकाचे हेडफोन्स घेतले, अरिजित ची प्ले लिस्ट लावली. ‘हो चाळीशी कडे झुकलो असलो तरी आपल्याला ही आवडूच शकतो की’ म्हणत तिनं प्ले लिस्ट सुरू केली. त्या आवाजात नवऱ्याने दोनदा हाक मारली तेही तिला ऐकू आलं नाही. ती मस्त गिरक्या घेत होती,चेहऱ्यावर ह्या कानापासून ते त्या कानापर्यंत फाकलेले हसू पाहून नवरा किंचित चिडलाच !’ कसला आनंद झालाय एवढा? माझे आई बाबा घरी नाहीत ह्याचा इतका आनंद व्हावा तुला! ते काय रोज तुला छळतात का ? अगदी सासरी जाच आहे आणि आज सुटका झाली आहे असं सुरू आहे की तुझं!”

तिनं फक्त त्याला ‘ तू ऑफिस ला निघ, तुला उशीर होतोय ‘एवढंच उत्तर दिलं.

शेवटी सगळी शांतता झाल्यावर तिनं स्वतः साठी मोठा कप भर कॉफी बनवली आणि सोफ्यावर आडवी झाली. कॉफीचा घोट घेत घेत तिनं विचार केला की ‘खरंच जाच आहे का मला ह्या लोकांचा?कोणाकडे तक्रार करावी इतकं वाईट आहे का सगळं?’

पण तिला दहा वर्षांपूर्वी घरासाठी सोडलेली नोकरी आठवली. तेव्हा सासू सासऱ्यांना सतत लग्न,मुंजी,ट्रिप यासाठी जायचं असायचं आणि हिच्या लेकाची जबाबदारी तेव्हा कोण घेणार ह्यावरून सतत वाद व्हायचे, बरं पाळणाघर हा शब्द तर हद्दपार च होता घरातून मग काय हिनेच नोकरीवर पाणी सोडलं! हा जाच होता का?

पुढे सवयीनं तिनं तेही स्वीकारलं, मग घरातलं करण्यात रमली तर तिथेही सगळे गृहीत धरायला लागले! घरी आहेस ना मग गरम पोळ्याच कर, आज सणाचं सगळं साग्र संगीत होऊ दे, पाहुणे येणार आहेत तेव्हा घरचं चारी ठाव जेवण च हवं! पुढे पुढे तर  तिला कल्पना न देताही पाहुणे, सासूच्या मैत्रिणी,सासऱ्यांचा मॉर्निंग walkचा ग्रुप अचानक घरी धडकू लागले, ही आपली राबतेय ,हा जाच होता का?

नवरा ही वाटेल तेव्हा वाटेल तेवढे मित्र जमवून पार्ट्या करू लागला कारण ह्याचीच बायको दिवसभर घरी! हा जाच होता का?

तिच्या माहेरी आई करायची तशी भाजी तिला आजवर एकदाही तिच्या ह्या स्वयंपाकघरात बनवता आली नाही! हा जाच होता का?

रविवारी खूप वाटायचं तिला की आज मीही सुट्टी घेते , काहीही बनवत नाही ,कामं उद्या करते ,पण मग सासूबाई खुडबुड करू लागायच्या मग तिचं संस्कारी मन तिला स्वस्थ बसू द्यायचं नाही आणि तिच्या रविवारच्या सुट्टीला ती मनातच तिलांजली द्यायची! असं कितीतरी वेळा घडून गेलं ,हा  जाच होता का?

आता मुलं थोडी मोठी झाली ,तिला थोडी privacy असावी असं मनापासून वाटू लागलं, नवरा ही तयार असायचा तिला कुठे न्यायला ,पण आई बाबांचं सगळं जिथल्या तिथे केल्याशिवाय नाही बरं का! हा जाच होता का?

आता तिला एकटं राहावं असं वाटत होतं तर सासू सासऱ्यांच्या तब्येतीच्या तक्रारी मुळे ते बाहेर पडेनासे झाले ,तिला कुठेच मोकळा श्वास मिळेना! ‘मला थोडे दिवस तरी एकटं राहू द्यात हो  ‘ असं मन ओरडून सांगायचं पण तोंडाने कधी बोलताच आले नाही ! हा जाच होता का?

बाप रे ,किती हे प्रश्न! खरं तर हा कधीही कोणालाच न दिसणारा जाच कुठल्याच पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयापुढे मांडता येणार नव्हता तिला ,कारण हा काही शारीरिक छळ किंवा गुन्हा नव्हे! हे परंपरेने आलेलं  दान होतं तिच्याकडे जे चुपचाप तिला आपल्या ओटीत घ्यायचं होतं. आता कितीतरी जणी त्या विरुद्ध आवाज उठवून स्वतः पुरतं जगून  घेणाऱ्या होत्या पण तिला मात्र नाहीच जमलं आजवर !

म्हणून आजच्या सारखे असे सात आठ तास जरी मिळाले तरी त्या cindrela सारखी एक नजर घड्याळाच्या काट्यावर ठेवत ती जगून घेत होती!

ठोके पडले की पुन्हा आपल्या पूर्वीच्या रुपात सर्वांसाठी हजर!!